मुख्यपृष्ठ › सामाजिक · वडगाव कांदळी

वडगाव कांदळीत ३५० नागरिकांना एसटी स्मार्ट कार्ड ! ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वडगाव कांदळीत ३५० नागरिकांना एसटी स्मार्ट कार्ड! ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आदर्श निर्मल ग्राम वडगाव (कांदळी), ता. जुन्नर येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ. शोभाताई पाचपुते यांच्या आयोजनाखाली शिक्षण व सामाजिक विकास फाउंडेशनच्या वतीने एसटी NCMC स्मार्ट कार्ड शिबिर व कार्ड प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि इतर ग्रामस्थांना एसटी स्मार्ट कार्डचा लाभ मिळावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जवळपास ३५० नागरिकांनी नावनोंदणी करून योजनेचा लाभ घेतला. ऑनलाइन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना मारुती मंदिर हॉल, वडगाव कांदळी येथे मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट कार्ड प्रदान करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, पंचायत सदस्या सौ. माधुरीताई निलख, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा फुलवडे, अहमद सय्यद, ज्येष्ठ मार्गदर्शक आर. डी. पाचपुते यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. एसटी स्मार्ट कार्डचे फायदे, रिचार्ज करण्याची पद्धत आणि कार्डचा वापर याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांचा वेळ, प्रवासाचा त्रास आणि खर्च वाचण्यास मदत होणार आहे.